हॉटेलमध्ये किरकोळ वादातून तरुणांमध्ये हाणामारी, दोघे जखमी, आरोपी अटकेत
पिंपरी, ता. १६ - किरकोळ कारणावरुन त्रिवेणीनगर चौक- कृष्णानगर येथील हॉटेलमध्ये मारहाणीच्या घटनेत दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता. १४) घडली आहे. आरोपींना अटक केली आहे.
याबाबत, सागर बापु तानवडे (वय २२ वर्षे) याने फिर्याद दिली आहे. आरोपी सागर रघुनाथ धनवडे व तेजस रघुनाथ धनवडे (दोघे रा. निगडी ओटास्कीम) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर व फिर्यादीचा मित्र अभिषेक वसंत चव्हाण हे असे दारु पिण्यासाठी हॉटेमध्ये गेले होते. अभिषेक याने त्याचे खांदयावर स्वतःचा रुमाल टाकलेला असताना, तो रुमाल तेथे असलेल्या इसमाने ओढून स्वतःच्या खांदयावर घेतला. तेव्हा सागर व अभिषेकने त्याला "तू रुमाल का घेतला, आमचा रुमाल आंम्हास परत दे" असे म्हटले असता, त्या इसमाने "तुला माहीत आहे का, मी कोण आहे" असे बोलुन दमदाटी व धक्काबुक्की करुन, "थांब, आता मी तुला दाखवितो मी कोण आहे ते, माझे भावालाच बोलावुन घेतो" असे म्हणत त्याच्या भावाला तेथे बोलावून घेतले. त्या दोघांनी मिळून सागर व अभिषेकला शिवीगाळ करत कमरेच्या बेल्टने मारहाण केली. धारधार कटरसारख्या हत्याराने फिर्यादीच्या पाठीवर वार करुन त्यास जखमी केले.
आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३५२, ३५१(२), ३(५), ११८(१), ११८(२), ११५(२) नुसार रविवारी (ता. १५) गुन्हा दाखल केला आहे.