साडे सहा लाखांचे अंमली पदार्थ जप्त, पती-पत्नीला अटक
पिंपरी, ता. १६ - सुपारी व्यावसायिक असलेल्या पती-पत्नीकडून तब्बल ६ लाख ६३ हजारांचे अंमली पदार्थ पोलिसांनी रविवारी (ता. १५) जप्त केला आहे. त्यांच्याकडून ३ मोबाईल व १ चारचाकी हस्तगत केली आहे. या दांपत्याला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी अंमली पदार्थविरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी-चिंचवडचे पोलिस शिपाई मितेश मोहन यादव यांनी फिर्याद नोंदवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास दत्तात्रय मांढरे (वय ५४ वर्षे) व अनुराधा कैलास मांढरे (वय ५४) हे दांपत्य आणि रितेश गुप्ता (रा. कनोज, उत्तर प्रदेश) हे आरोपी आहेत.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये आरोपी मांढरे यांच्या चैतन्य फूड्सच्या (मुळशी) गोडाऊनमध्ये एकूण ६,६३,०००/-रुपये किंमतीचे अंमली पदार्थ मिश्रीत पावडर व काळ्या रंगाचा अंमली पदार्थ मिश्रीत पातळ पदार्थ आढळले. ३ मोबाईल व १ चारचाकी गाडीही सापडली. हा अंमलीपदार्थ आरोपींनी बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगला होता. हा अंमली पदार्थ कोठून आणला असे विचारले असता आरोपींनी कनोज उत्तर प्रदेश येथील आरोपी रितेश गुप्ता याच्याकडून आणल्याचे सांगितले.
आरोपी पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. तिसरा आरोपी गुप्ता याचा शोध सुरु आहे. सर्व आरोपींवर एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १७ (ब), २२ (ब), २९ प्रमाणे हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.