देशाची गरज भागेल एवढा पुरेसा इंधन साठा उपलब्ध, एएनआय'ची माहिती
पुणे, ता. ५ - इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर गर्दी बघायला मिळतेय. त्यामुळे, केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एएनआय'ने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिलीय की, पेट्रोल आणि डिझेलच्या मर्यादित स्वरुपातील पुरवठ्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. देशाची गरज भागेल एवढा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही.
सूत्रांनी सांगितले आहे की, कतारकडून होणाऱ्या एलएनजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. कतार हा जगाच्या एकूण गरजेच्या २० टक्के 'एलएनजी'चा (द्रवरूप नैसर्गिक वायू) पुरवठा करतो. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे 'कतार एनर्जी'ने 'फोर्स मॅज्योर' घोषित केले आहे. म्हणजे अनपेक्षित संकटामुळे कराराप्रमाणे पुरवठा करणे सध्या कतारला शक्य नाही.
भारतात देशांतर्गत गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी, गेल म्हणजेच गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडदेखील 'फोर्स मॅज्योर' घोषित करणार आहे. याद्वारे, खत कारखाने आणि घरगुती गॅस यांसारख्या प्राधान्य क्षेत्रांना गॅसचा पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे 'एएनआय'च्या सूत्रांनी सांगितले.