युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, तिघांनी तीन कोयत्यांनी केले वार, काळेवाडीतील घटना
पिंपरी, ता. २३ - ओळखीच्या एका युवकावर तीन युवकांनी तीन कोयत्याने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (ता. २१) जगतापनगर-थेरगाव येथे रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. तीनपैकी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत, सौरभ विलास चौधरी (वय २४ वर्षे, रा. जगतापनगर, थेरगांव) याने तक्रार दिली आहे. आरोपी गौरव ऊर्फ नन्या गौतम वाघमारे (वय २२ वर्षे, रा. आनंदनगर झोपडपटटी, चिंचवड), रितेश क्षीरसागर (वय २१ वर्षे, रा. आनंदनगर झोपडपटटी, चिंचवड) व एक अनोळखी साथीदार यांनी सौरभला मारहाण केली. आरोपी गौरव व रितेश यांना अटक केली आहे.
फिर्यादी सौरभ व त्याचे मित्र आदित्य अनिल धिवार, गौरव दत्ता लोंढे, ओमकार महादेव कुचेकर व विनायक अशोक थोरात हे जगतापनगरमधील समर्थ क्लिनिकसमोर गप्पा मारत उभे होते. तेव्हा सौरभच्या ओळखीचे आरोपी गौरव व रितेश तेथे दुचाकीवरुन आले. एकाने सौरभला शिवीगाळ केली व कमरेला असलेल्या लोखंडी कोयत्याने सौरभच्या डोक्यात व उजव्या हाताच्या कोपराजवळ जोरात वार केले. दुसऱ्यानेही त्याच्याकडे असलेला कोयता सौरभच्या डाव्या हाताच्या कोपराजवळ मारला व त्यांच्यासोबतच्या अनोळखी मुलानेही त्याच्या हातातील कोयता सौरभच्या डाव्या हाताच्या पंजावर मारला. यात सौरभ गंभीर जखमी झाला.
या तीन आरोपींनी त्यांच्याकडील कोयते सौरभच्या मित्रांवर उगारुन "तुम्ही मध्ये आला तर याचेसोबत तुम्हाला सुध्दा येथेच खल्लास करुन टाकीन" अशी धमकी दिली व त्या तिघांनी त्यांचे हातातील कोयते हवेमध्ये फिरवून "आहे का कुणी आम्हाला टक्कर देणार आम्ही पिंपरी चिंचवडचे भाई आहोत." असे म्हणत तिथे दहशत निर्माण केली.
तिन्ही आरोपींवर काळेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१),३५२,३५१ (२) (३), ३ (५) सह शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४(२५), ४(२७), ३५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३)/१३५ सह क्रिमिनल लॉ. अमेंडमेंट अॅक्ट कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.