भारतीय जहाज 'नंदा देवी' सुमारे ४७ हजार टन एलपीजी घेऊन गुजरातमधील वाडिनार बंदरात दाखल
Mar 17 2026
50
भारतीय जहाज 'नंदा देवी' सुमारे ४७ हजार टन एलपीजी घेऊन गुजरातमधील वाडिनार बंदरात दाखल
पुणे, ता. १७ - आखाती देशांमधील युद्धामुळे आपल्या देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. देशभरात नागरीकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. असे असताना, भारतीय जहाज 'नंदा देवी' सुमारे ४७ हजार टन एलपीजी घेऊन गुजरातमधील वाडिनार बंदरात दाखल झाले आहे. सध्या या जहाजातील गॅस दुसऱ्या जहाजात ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी कॅरिअर 'नंदा देवी' दिनदयाल पोर्ट प्राधिकरणाच्या वाडिनार टर्मिनल जवळ समुद्राच्या मध्यभागी पोहोचले आहे. रात्री २ वाजताच्या सुमारास हे जहाज भारतात दाखल झालं आहे. या ठिकाणीच ४७ हजार टन एलपीजी दुसऱ्या जहाजात हस्तांतरित केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गॅसचा अर्धा साठा एन्नोर बंदरावर उतरवला जाईल, तर उर्वरित साठा हल्दिया बंदराकडे पाठवला जाणार आहे.
मुंद्रा बंदरावर उभे असलेले 'शिवालिक' नावाचे एलपीजी कॅरिअर देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या जहाजातून प्रथम मुंद्रा बंदरावर १२ हजार टन एलपीजी उतरवले जाणार आहे. त्यानंतर वाडिनारच्या मध्य समुद्रात पोहोचणार आहे. सायंकाळपर्यंत 'शिवालिक' जहाजातून देखील उर्वरित एलपीजी साठा दुसऱ्या जहाजात ट्रान्सफर केला जाणार आहे.
या जहाजांमधून एलपीजी आणल्यामुळे देशातील विविध भागांमध्ये एलपीजी पुरवठा होणार आहे. याशिवाय इतर २२ जहाजंही स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजमधून सुखरुप भारता येत आहेत, असे भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे.