राज्यातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप दिले जाणार
पुणे, ता. १५ - "महाराष्ट्र हे खास कृषीसाठी कृत्रिमबुद्धिमत्ता (एआय) धोरण स्वीकारणारे देशातील पहिले राज्य आहे. शासनाच्या कृषी योजनांची अंमलबजावणी आणि लाभार्थी सेवा आता मोठ्या प्रमाणावर डिजिटल माध्यमातून होत आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेला आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे ही काळाची गरज आहे. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॅपटॅापसारखी आवश्यक डिजिटल साधनसामग्री उपलब्ध झाल्यामुळे योजनांची माहिती तात्काळ ऑनलाइन नोंदविणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि शेतकऱ्यांच्या अर्जांवर तत्पर कार्यवाही करणे अधिक सुलभ होणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळण्यास होणारा विलंब कमी होऊन सेवा वितरण अधिक वेगवान आणि प्रभावी होईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यातील १३,२७५ क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यासाठी १०९ कोटी रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. सदर लॅपटॉपचा पुरवठा जुलै २०२६ अखेर पूर्ण होण्याचे नियोजन असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत ते पोहोचविण्यात येतील.
पुरवठादाराकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक लॅपटॉपची १०० टक्के गुणवत्ता तपासणी करण्यात येणार असून ही तपासणी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे या स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली १३,२७५ क्षेत्रीय कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.