पिंपरी-चिंचवड शहरात लवकरच सर्वसमावेशक 'शौचालय धोरण' लागू होणार
स्थायी समितीच्या बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांची सर्वसमावेशक शौचालय धोरणाला मान्यता
पिंपरी, ता. ३० जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या तुलनेत निर्माण होणाऱ्या गरजा लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने महत्त्वपूर्ण आणि 'पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सर्वसमावेशक शौचालय धोरण' तयार करण्यात आले आहे. महापालिकेच्या बुधवारी (ता. २९) पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी या सर्वसमावेशक शौचालय धोरणाला मान्यता दिली.
शहरातील सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे यासाठी शौचालय सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचास जाण्याची प्रवृत्ती पूर्णपणे रोखणे, सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची उपलब्धता वाढवणे आणि अस्तित्वात असलेल्या शौचालयांची नियमित देखभाल व व्यवस्थापन करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. सध्या शहरात शौचालयांची सद्यस्थिती व मागणी यानुसार सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, वाहतूक केंद्र, उद्याने, धार्मिक स्थळे, झोपडपट्टी व दाट लोकवस्तीचे भाग, प्रमुख रस्ते व इतर गर्दीची ठिकाणे यांचा सखोल विचार करून या नवीन धोरणाचे नियोजन करण्यात आले आहे.
नवीन शौचालय धोरणातील प्रमुख तरतूदी -
- सर्वसमावेशक सुविधा - महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी नागरिकांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन सर्वसमावेशक व सुलभ शौचालय व्यवस्था निर्माण करणे.
- पायाभूत सुविधा व नियोजन - शौचालयांची स्थान निश्चिती, वापर, देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता, पाणीपुरवठा, मलनिसारण व्यवस्था, विद्युत व्यवस्था, प्रकाशयोजना, आणि सुरक्षा यांचे चोख नियोजन.
- दिव्यांग व बालक स्नेही रचना - दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ (Accessible) सुविधा तसेच माता व बालकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांची उपलब्धता.
- डिजिटल मॅपिंग व तक्रार निवारण - शौचालयांचे डिजिटल मॅपिंग करणे, प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करणे आणि देखभाल व व्यवस्थापनासाठी आधुनिक कार्यपद्धतीचा अवलंब करणे.
- सार्वजनिक-खाजगी सहभाग (PPP)- आवश्यकतेनुसार सार्वजनिक-खासगी सहभागातून (Public-Private Partnership) शौचालय व्यवस्थापन करण्याच्या तरतुदींचा समावेश आहे.
नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर....
"पिंपरी-चिंचवड हे देशातील एक अग्रगण्य आणि वेगाने विकसित होणारे शहर आहे. शहराच्या वाढत्या विस्तारानुसार नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आरोग्य विभागामार्फत तयार करण्यात आलेले हे 'शौचालय धोरण' शहरातील गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि वस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सुरक्षिततेचा व सोयीचा यामध्ये विशेष विचार करण्यात आला असून, स्थायी समितीने या धोरणाला मंजुरी दिली आहे. हे धोरण अंतिम मान्यतेसाठी नजीकच्या महापालिका सभेपुढे सादर केले जाणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या स्वच्छता व आरोग्य व्यवस्थापनात एक क्रांतिकारी बदल घडेल " - अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती पिंपरी चिंचवड महापालिका