सजावटीसाठी प्लास्टिकच्या फुलांच्या वापरावर बंदी घालणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Feb 27 2026
53
सजावटीसाठी प्लास्टिकच्या फुलांच्या वापरावर बंदी घालणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
पुणे, ता. २७ - पर्यावरणाचे व सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि नैसर्गिक फुलांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार आता सजावटीसाठी प्लास्टिकच्या फुलांचा वापर करणाऱ्यांवर बंदी घालणार आहे. त्यासाठी राज्य सरकार लवकरच आदेश जीआर काढणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर कार्यक्रमांमध्ये सजावटीसाठी कृत्रिम फुले वापरणाऱ्यावर व सजावट व्यवसायांवरही कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत पर्यावरणाचा विषय मांडताना सांगितले की, ''कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे, नैसर्गिक फुले उत्पादक शेतकरी, विशेषतः कोल्हापूरमधील हरितगृह उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहेत.'' भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विषारी रंगांचा आणि नॅनोपार्टिकल्सचा मानवी आरोग्यावर विशेषतः मुलांच्या मेंदूच्या आरोग्यावर होणाऱ्या हानिकारक परिणामांविषयी सांगितले.
त्यावर, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ''कृत्रिम फुले दिसायला आकर्षक असली तरी पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत. ही फुले जैविकरित्या विघटित होत नाहीत, ज्यामुळे प्लास्टिक कचरा आणि पर्यावरणाचे नुकसान वाढते. नैसर्गिक फुले पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही त्यांचा विपरीत परिणाम होत आहे. सरकार टप्प्याटप्प्याने अशा फुलांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याच्या दिशेने काम करत आहे. त्यासाठी लवकरच आदेश काढला जाईल.''