येत्या चार-पाच दिवसांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता, हवामान विभागाची माहिती
पुणे, ता. १७ - राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांच्या वर पोहोचले आहे. तरीही येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी गारपीटीचा इशाराही देण्यात आला आहे.
सोमवारी (ता. १६) लातूरमधील देवणी तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह काहीकाळ झालेल्या मुसळधार पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
विदर्भात अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदियात गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशीव आणि लातूर येथे पावसाचा अंदाज आहे.
तसेच, मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगरसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूरातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ आणि १९ मार्चला विजांच्या गडगडाटांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.