महाराष्ट्रातील अनेक भागांत २० ते २४ एप्रिलपर्यंत वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
Apr 21 2026
18
महाराष्ट्रातील अनेक भागांत २० ते २४ एप्रिलपर्यंत वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
पुणे, ता. २१ - भारतीय हवामान विभागाने सोमवारी (ता. २०) पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे व विजांच्या गडगडाटासह पावसाची व गारपीटीची शक्यता वर्तवली आहे.
मंगळवारी (ता. २१) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यभरात पूर्वमोसमी पावसाला अनुकूल हवामान असल्याने मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता वाढली आहे. वादळी पावसाची शक्यता असलेल्या जिल्ह्यांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान बाहेरच्या दिशेने वाहणारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तसेच वायव्य भारतात समुद्र सपाटीपासून १२.६ किलोमीटर उंचीवर ताशी ११० नॉट्स वेगाने जोरदार पश्चिमी वारे वाहत आहेत. विदर्भात वर्धा आणि अकोला येथे उच्चांकी तापमान नोंदवले आहे. सोमवारी (२० एप्रिल) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील अकोला आणि वर्धा येथे देशातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली . राज्यातील सर्वांत कमी तापमान महाबळेश्वर येथे २०.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी जारी करण्यात आला आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.