माननीयांच्या कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी होतेय पैशांची उधळपट्टी, माजी नगरसेवक मारुती भापकर यांचा आरोप
Mar 10 2026
41
माननीयांच्या कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी होतेय पैशांची उधळपट्टी, माजी नगरसेवक मारुती भापकर यांचा आरोप
पिंपरी, ता. १० - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असल्याचा आरोप केला आहे. ही उधळपट्टी तात्काळ थांबवावी आणि खरेदी प्रक्रियेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मारुती भापकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन 2022 ते 2026 या प्रशासकीय राजवटीत महापालिकेने करदात्या नागरिकांच्या पैशातून अनेक खर्चिक प्रकल्प राबवले. यामुळे महापालिकेच्या ठेवी मोडण्यात आल्या तसेच कर्जही काढावे लागले. सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांमुळे ठेकेदारांचे चार कोटी रुपयांहून अधिक देणे बाकी आहे. अशा परिस्थितीत महापालिका मुख्यालयातील महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेते, विरोधी पक्षनेते तसेच विविध विषय समिती सभापती यांच्या कार्यालयांच्या सुशोभीकरणासाठी टेबल, खुर्च्या, सोफा, कार्पेट आणि पडदे आदी वस्तूंची खरेदी भांडार विभागामार्फत करण्यात येत असून या कामांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.
महापालिकेने काटकसर आणि पारदर्शक कारभाराचे धोरण जाहीर केले असताना अशा प्रकारे नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप करत हे काम तात्काळ थांबवावे आणि संबंधित खरेदीची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल करदात्या नागरिकांसमोर जाहीर करावा, अशी मागणी भापकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.