राज्य शासनाच्या महाआवास अभियानांतर्गत मावळ तालुक्याला सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कार
पिंपरी, ता. १० - राज्य शासनाच्या महाआवास अभियानांतर्गत मावळ तालुक्याला सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कार प्राप्त झाले असून, पुण्यात आयोजित 'मिनी सरस सावित्री जत्रे'मध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी हे पुरस्कार स्वीकारले. यावेळी यशवंत पंचायतराज अभियानाअंतर्गत गुणवंत कर्मचारी व आदर्श ग्रामपंचायत अधिकारी या विभागस्तरीय पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.
उमेद अभियानांतर्गत पुणे जिल्हास्तरीय 'मिनी सरस सावित्री जत्रे'चे आयोजन पुण्यात ऍग्रिकल्चर मैदानावर करण्यात आले आहे. या जत्रेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी नियुक्त सेलेब्रिटी शिवाली परब, यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेदच्या प्रकल्प संचालक शालिनी कडु, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भूषण जोशी, सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
महाआवास अभियानाअंतर्गत मावळ तालुक्याला सात पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यात महाआवास अभियान ग्रामीण- २ मधील २०२१-२२ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून तृतीय क्रमांकाचे मानांकन तसेच, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून कार्ला ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे मानांकन, अमृत महाआवास अभियानमधील २०२२-२३ अंतर्गत राज्य पुरस्कृत योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून द्वितीय क्रमांकाचे मानांकन, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून महागावला द्वितीय क्रमांकाचे मानांकन व प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून कार्ला ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
महाआवास अभियानमध्ये सन २०२३-२४ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये सर्वोत्कृष्ट तालुका द्वितीय क्रमांकाचे मानांकन व राज्य पुरस्कृत आवास योजनामध्ये सर्वोत्कृष्ट तालुका तृतीय क्रमांकाचे मानांकन मावळ तालुक्याला प्राप्त झाले. हे सर्व पुरस्कार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, विस्तार अधिकारी शुभांगी भुमकर, प्रियांका मालपोटे व तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी स्विकारले.