मावळातील प्रस्तावित उच्चदाब वीजवाहिनी प्रकल्प रद्द करावा, रयत प्रहार संघटनेची मागणी
पिंपरी, ता. २० - मावळ तालुक्यातील प्रस्तावित उच्चदाब वीजवाहिनी प्रकल्पाविरोधात रयत प्रहार संघटनेने प्रकल्प तत्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास धरणे आंदोलन किंवा आमरण उपोषणाचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई मोरे यांनी दिला आहे.
या संदर्भात मावळचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बोईसर ते पुणे या मार्गावरील ७६५ केव्ही क्षमतेची अतिउच्चदाब वीजवाहिनी उभारण्यात येणार असून, त्यासाठी टॉवर उभारणीमुळे मावळातील सुमारे २० गावांतील तसेच अप्रत्यक्षपणे सुमारे ६० गावांतील शेतजमिनी बाधित होणार आहेत. वीजवाहिच्या परिसरात सुमारे ४०० फूट क्षेत्रात शेतघर बांधकाम, ऊस, बांबू लागवड करता येणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प तत्काळ रद्द करावा. निवेदनावर अध्यक्ष गुलाब तिकोने, तालुका अध्यक्ष संतोष दळवी, चिटणीस राजू बेदमुथा, कार्याध्यक्ष सोनू खाडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
याबाबत आमदार सुनील शेळके यांनी पत्राद्वारे शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही स्वतंत्र पत्र पाठवून प्रकल्प स्थगित करण्याची मागणी केली आहे.