उन्हाळी सुट्ट्यांसाठी १५ एप्रिल ते जूनपर्यंत एसटीच्या पुणे विभागातून ४५० जादा गाड्या
Mar 20 2026
49
उन्हाळी सुट्ट्यांसाठी १५ एप्रिल ते जूनपर्यंत एसटीच्या पुणे विभागातून ४५० जादा गाड्या
पुणे, ता. २० - उन्हाळी सुट्ट्यांसाठी पुणे एसटी विभागाकडून १५ एप्रिल ते जूनपर्यंत ४५० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. या गाड्या पुणे विभागातून कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोकण या भागांमध्ये जातील.
शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्या की बहुसंख्य कुटुंब एप्रिल-मे महिन्यात पुण्यातून गावी जातात. शिक्षण-नोकरीसाठी शहरात आलेले विद्यार्थीही सुट्ट्यांसाठी गावाकडे जायला निघालेले असतात. तसेच अनेकजण विविध ठिकाणी सहलीलाही जात असतात. त्यामुळे एसटीस्थानकांवर प्रचंड गर्दी होते आणि त्यामुळे प्रवासाची गैरसोयदेखील होते. त्यामुळे सर्व नागरीकांना सुरक्षितपणे आपापल्या गावी जाता यावे आणि सुखरुपपणे गावाहून परतता यावे म्हणून 'एसटी'च्या पुणे विभागाने यंदाही विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे.
एसटीच्या जादा बससेवेचा लाभ घेऊन नागरीकांनी सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन एसटी पुणे विभागाने केले आहे.
''प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातून जादा बस सोडण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास करण्यापेक्षा सुरक्षित प्रवासासाठी एसटीचा लाभ घ्यावा.'' - अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे