पाण्याचा जपून व जबाबदारीने वापर करा, महापौर रवी लांडगे यांचे शहरवासियांना आवाहन
पिंपरी, ता. २८ - पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरावर पाणीटंचाईचे सावट आहे. महापालिकेमार्फत तातडीने उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे. पुरवठा नियोजन, पर्यायी स्रोत व तांत्रिक उपाय यावर सातत्याने काम सुरु आहे. पाणीपुरवठा विभागाला आवश्यक ते कडक निर्देश दिलेले आहेत आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले आहे. त्याबरोबरीनेच त्यांनी पाण्याचा काटसकरीने वापर करुन पाणी वाचवण्याचे आवाहन नागरीकांना केले आहे.
महापौरांनी म्हटले आहे की, ''पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहरात निर्माण झालेली पाणीटंचाई मी अत्यंत जवळून अनुभवत आहे. प्रत्येक नागरिकाच्या अडचणीची मला जाणीव आहे आणि त्यामागची अस्वस्थता देखील मी समजू शकतो.महापालिकेमार्फत तातडीने उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. पर्यायी स्रोत, पुरवठा नियोजन व तांत्रिक उपाय यावर सातत्याने काम सुरू आहे. मी स्वतः पाणीपुरवठा विभागाला आवश्यक ते कडक निर्देश दिलेले आहेत आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. मात्र, उपलब्ध पाणी स्रोत मर्यादित असल्यामुळे तक्रारींमध्ये वाढ होत आहे, ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही.''
पाणी टंचाईच्या या लढ्यात नागरीकांच्या सहकार्याची गरज आहे महापौरांनी अधोरेखीत केली आहे. पाण्याचा जपून व जबाबदारीने वापर करा, अनावश्यक पाणी वाया जाऊ देऊ नका, गळती तात्काळ दुरुस्त करा, पाण्याचे योग्य नियोजन करा अशी जाहीर विनंती त्यांनी नागरीकांना केली आहे. “पाणी जपा… कारण प्रत्येक थेंब अमूल्य आहे!” असे महापौरांनी सांगितले आहे.