राष्ट्रभक्तीची ज्योत समाजकारण आणि लोकसेवेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील - आमदार महेश लांडगे
राष्ट्रभक्तीची ज्योत समाजकारण आणि लोकसेवेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील - आमदार महेश लांडगे
ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’आमदार लांडगे यांना अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान
पिंपरी, ता. २५ - '' 'ब्राह्मण जागृती सेवा संघ, पिंपरी-चिंचवड' यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ स्वीकारण्याचा सन्मान मला लाभला, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची व गौरवशाली बाब आहे. हा पुरस्कार केवळ माझ्या कार्याचा गौरव नसून, राष्ट्रहित, समाजसेवा आणि हिंदुत्वनिष्ठ विचारांच्या वाटचालीला मिळालेली प्रेरणा आहे. सावरकरांनी आपल्या लेखणीने, विचारांनी आणि त्यागाने राष्ट्रभक्तीची जी ज्योत प्रज्वलित केली, तीच ज्योत समाजकारण आणि लोकसेवेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील.'' अशी भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ प्रखर हिंदुत्ववादी नेते आमदार महेश लांडगे यांना ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते रविवारी (ता. २४) प्रदान करण्यात आला. निगडी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात हा समारंभ पार पडला.
आमदार लांडगे म्हणाले, ''स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या विश्वासाला न्याय देताना, हा सन्मान माझ्या जबाबदाऱ्यांची जाणीव अधिक दृढ करणारा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राष्ट्रनिर्माणाचे विचार, स्वाभिमानाची शिकवण आणि समाजजागृतीची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, हीच या पुरस्काराची खरी पावती असेल. हा सन्मान फक्त माझा नसून, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे. समाजहित, राष्ट्रहित आणि विकासाच्या वाटेवर अधिक ताकदीने कार्य करत राहण्याची ग्वाही मी यानिमित्ताने देतो.''
ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष राजन लोणकर, ब्राह्मण जागृती सेवा संघाचे संस्थापक अंकित काने, रोहन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. अविनाश धर्माधिकारी यांनी मार्दर्शन केले.