मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये ४० तासानंतरही बचावकार्य सुरुच, अजून आठ जण अडकलेले

मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये ४० तासानंतरही बचावकार्य सुरुच, अजून आठ जण अडकलेले

मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये ४० तासानंतरही बचावकार्य सुरुच, अजून आठ जण अडकलेले

पिंपरी, ता. १० जुलै २०२६ - अतिवृष्टीमुळे मोशी कचरा डेपो येथील महानगरपालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला. घटनेला ४० तास उलटून गेले तरी बचावकार्य सुरु आहे. इमारतीत एकूण २३ व्यक्ती अडकल्या होत्या. त्यापैकी आतापर्यंत १४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. गुरुवारी (दि. ९) सकाळी बाहेर काढलेल्या एका कामगाराचा मृत्यू झाला. राहिलेल्या आठ जणांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत एकूण २३ व्यक्ती अडकल्या होत्या. पाच जण स्वतः बाहेर आले होते. बचावकार्यादरम्यान नऊ जणांना बाहेर काढण्यात आले. गुरुवारी (ता. ९) सकाळी बाहेर काढलेल्या एकाचा मृत्यू झाला. मात्र, उर्वरित आठ जणांचा शोध सुरू आहे. सुरवातीला इमारतीचे मजले पाडून बचावकार्य करण्याचा विचार होता. पण, यात जीवितहानीचा धोका होऊ शकतो म्हणून आता इमारतीच्या बाजूचा कचरा प्रथम हटवून जागा रिकामी करण्यात येत आहे. त्यानंतर इमारतीतील कचरा बाहेर काढून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

गार्बेज पोकलेनच्या साहाय्याने रात्रभर कचरा स्थलांतरित करण्याचे काम सुरू होते. मात्र इमारतीच्या आत रात्री कोणतेही कार्य करण्यात आले नाही. साईनाथ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आठ जखमींपैकी चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित चार जणांपैकी दोघे आयसीयूत आहेत. एकाला छाती व पोटात गंभीर मार लागला असून, दुसऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचे ऑपरेशन यशस्वी झाले आहे. गुरुवारी (दि. ९) सकाळी बाहेर काढलेल्या एकाचा मृत्यू झाला. भावेश मोहन वाणी (वय ३३, रा. रुपीनगर, पिंपरी-चिंचवड, पुणे; मूळ रा. शिरसोली, जळगाव) असे मृत्यू कर्मचाऱ्याचे नाव आहे.  ते हा घनकचरा प्रकल्प सांभाळणाऱ्या अॅन्थोनी लारा कंपनीत लेखापाल होते. 

 या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचे नातेवाईक आता संतापले आहेत.  अडकलेल्या व्यक्तींचे नातेवाईक सतीश गायकवाड यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकी गंभीर परिस्थिती असताना पुरेशी यंत्रणा का नाही? कुडळवाडीमध्ये ७०० एकर टेकडी दोन दिवसांत साफ केली जाते, मग इथे पुरेशा मशीन का उपलब्ध नाहीत ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आमचे लोक आत अडकले आहेत. ते जिवंत आहेत की नाही, हेही आम्हाला माहिती नाही. ही जबाबदारी नेमकी कोणाची ? महापालिकेचे अधिकारी किंवा संबंधित कंपनीचे प्रतिनिधी येथे दिसत नाहीत. मनुष्यबळ पाठवले जात नाही आणि प्रशासनाचा दृष्टिकोन अत्यंत वाईट आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories