भक्तिमय वातावरणात जगद्गुरु संत तुकाराम महाराजाची पालखी पिंपरी-चिंचवडमधून पुण्याकडे मार्गस्थ
भक्तिमय वातावरणात जगद्गुरु संत तुकाराम महाराजाची पालखी पिंपरी-चिंचवडमधून पुण्याकडे मार्गस्थ
पिंपरी, ता. ९ जुलै २०२६ - टाळ आणि अभंगांचे कानी पडणारे सूर, 'ज्ञानोबा-माऊली-तुकाराम' हा नामघोष, उंचावलेले भगवे ध्वज अन् विठुमाऊलीच्या भेटीची आस मनात घेऊन झपझप पावले टाकणारे वारकरी ........या मंगलमय वातावरणात जगद्गुरु संत तुकाराम महाराजाची पालखी गुरुवारी (ता. ९) पिंपरी-चिंचवडमधून पुण्याकडे मार्गस्थ झाली. असंख्य नागरिकांनी पालखीचे दर्शन घेतले. आज पावसाने विश्रांती घेतल्याने पालखी सोहळा सर्वांना अनुभवता आला.
काल, बुधवारी संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या पिंपरी-चिंचवडमध्ये पालखीचे आगमन झाले. रात्री पालखीचा मुक्काम आकुर्डीतील विठ्ठल मंदिरामध्ये होता. पहाट होताच पालखीचा आणि वारकऱ्यांचा पुढचा प्रवास सुरु झाला. पालखी मार्गावर पावलोपावली वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. नागरिक, संस्था, संघटना वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज होत्या. पाणी, चहा, बिस्कीटे, नाश्ता, सामान ठेवण्यासाठी पिशव्या असे विविध साहित्य वारकऱ्यांना वाटप करण्यात आले. 'पीसीएमसी न्यूज'च्या वतीने वारकऱ्यांना मोरवाडी चौकात पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांनी आणि उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
तुकाराम महाराजांच्या पादुकांना आणि पालखीला स्पर्श करुन दर्शन घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी वारकऱ्यांशी संवाद साधून आषाढी वारी कशी असते हे उत्सुकतेने जाणून घेतले, त्यांच्यासोबत फोटोही काढले. तरुणाईदेखील पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाली होती. अनेक महिला-युवती तसेच लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या. फुगड्या आणि खेळ खेळून वारीत सहभागी होण्याचा आनंद भाविकांनी घेतला. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तत्परतेने रस्ता चकाचक केला.