'एसटी'मध्ये लवकरच १७,४८२ पदांसाठी महाभरती होणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Mar 12 2026
50
'एसटी'मध्ये लवकरच १७,४८२ पदांसाठी महाभरती होणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
पुणे, ता. १२ - राज्य परिवहन महामंडळात लवकरच एकूण १७ हजार ४८२ पदांसाठी महाभरती होणार आहे. या भरती प्रक्रियेत सध्या काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचा विचार सरकारकडून करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सरनाईक म्हणाले की, ''एसटी महामंडळात सध्या चालक आणि वाहक पदांवर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. प्रवाशांची सेवा सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही भरती आवश्यक आहे.
चालक-वाहक पदांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. नियमित भरती करताना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा विचार करुन त्यांना प्राधान्य देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे.''
एसटीची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सरकारकडून दरवर्षी सुमारे पाच हजार नवीन बस खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यापैकी तीन हजार बसच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून टाटा मोटर्स कंपनीला सुमारे २१०० बस पुरवठ्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
''एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असले तरी प्रवाशांना विविध सवलती देण्याचे सामाजिक दायित्व सरकार पार पाडत आहे. महिलांसाठी ५० टक्के भाडे सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास यांसारख्या योजना सुरु आहेत. याशिवाय, विधानमंडळ सदस्य आणि पत्रकारांनाही काही प्रमाणात प्रवास सवलती दिल्या जातात.'' असे सरनाईक यांनी सांगितले.