'मुळशी धरणाचे २ टीएमसी पाणी आधी मुळशीकरांना द्यावे'
मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र कंधारे व जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले यांची मागणी
पिंपरी, ता. २१ - मुळशी धरणाचे २ टीएमसी पाणी आधी मुळशीकरांना द्या, मुळशीची गरज पूर्ण झाल्यानंतरच पुणे शहराला द्या, अशी मागणी मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र कंधारे व जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले यांनी केली आहे. मुळशी धरणातील पाणी मुळशीसाठी न मिळाल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री व संबंधित सर्व विभागांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुळशी तालुक्यातील टाटा कंपनीच्या मालकीच्या धरणातून तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा एक व दोन अशा दोन योजना राबवल्या आहेत. यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासन व टाटा कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार १.२ टीएमसी पाणी पिण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी राखीव आहे. हे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे मुळशी प्रादेशिक टप्पा १ व २ व कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वारंवार बैठका घेऊन सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, या धरणातील पाणी शासनाने अद्याप उपलब्ध करून दिलेले नाही.
यासाठी गेली ७ वर्षे सतत पाठपुरावा करुनही त्याची अद्यापपर्यंत दखल घेतलेली नाही. मुळशी धरणातील ९ टीएमसी पाणी पुणे शहरासाठी देण्याचा निर्णय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे. मुळशी तालुक्याच्या गरजेचे पाणी वगळून उर्वरित पाणी पुणे शहरासाठी देण्यास आमची काहीही हरकत नाही. मात्र, आमच्या हक्काचे पाणी आम्हालाच राहिले पाहिजे, असे ठामपणे निवेदनात सांगितले आहे.