news
clock
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत, पक्षांतर्गत कारवाईचे संकेत

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत, पक्षांतर्गत कारवाईचे संकेत

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत, पक्षांतर्गत कारवाईचे संकेत

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्त 

पुणे, ता. २१ - नाशिकमधील भोंदू अशोक खरात याला महिलांचे शोषण केल्याप्रकरणी अटक झाली आहे. याच खरातची पाद्यपूजा करतानाचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची छायाचित्रे समोर आली. त्यामुळे विरोधकांनी हल्लाबोल करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, चाकणकर यांनी शुक्रवारी (ता. २०) आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्त केला आहे. या प्रकरणी चाकणकर अडचणीत आल्या आहेत.

राजीनाम्यात त्यांनी  वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि घृणास्पद असल्याचे व या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दोन दिवसांत चाकणकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता पक्षातील सूत्रांनी सांगितली आहे.

पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, "हे प्रकरण अत्यंत गंभीर असून संबंधित व्यक्तीला अटक केली असून, राज्य सरकार याबाबत कठोर कारवाई करणार आहे. केवळ छायाचित्रांच्या आधारावर निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. तपासात ज्यांची नावे पुढे येतील, त्यांच्यावरही तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे." ''या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील.'', असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही स्पष्ट केले आहे.

आमदार अमोल मिटकरींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाशी या भोंदू बाबाच्या अनुयायांचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,  खरात व त्याच्या अनुयायांचे पाच महिन्यातील 'कॉल डिटेल्स' तपासण्यात यावेत. अजितदादांच्या सहयोग निवासस्थानासमोर १८ नोव्हेंबर रोजी काही अघोरी-संशयास्पद प्रकार घडल्याची माहिती समोर आली. त्यामुळे ही घटनेमागे काही गंभीर हेतू किंवा घातपाताचा प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्याची निष्पक्ष चौकशी करावी. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्याही अटकेची मागणी केली आहे.

अशोक खरात प्रकरणी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर पुढील एक-दोन दिवसांत चाकणकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे पक्षनेत्यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories