news
clock
तिच्या छातीवर जखमांचे वळ अन् तोंडात कोंबला पायमोजा....नसरापूर घटनेतील चिमुकलीच्या शवविच्छेदन अहवालात नोंद

तिच्या छातीवर जखमांचे वळ अन् तोंडात कोंबला पायमोजा....नसरापूर घटनेतील चिमुकलीच्या शवविच्छेदन अहवालात नोंद

 तिच्या छातीवर जखमांचे वळ अन् तोंडात कोंबला पायमोजा....नसरापूर घटनेतील चिमुकलीच्या शवविच्छेदन अहवालात नोंद

पुणे, ता. ५ - नसरापूर येथे लैगिंक अत्याचाराला बळी पडलेल्या बालिकेच्या शवविच्छेदन अहवालात मन हेलावून टाकणारी, धक्कादायक माहिती समोर येत आहे.  नीच आरोपीने अत्याचार करताना मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबला होता तसेच तिच्या छातीवर जखमांचे स्पष्ट वळ उमटले आहेत, असे प्राथमिक अहवालात नोंद करण्यात आली आहे. ससून रुग्णालयाने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. 

चिमुकलीची शवविच्छेदन प्रक्रीया ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागात 'इन कॅमेरा' पद्धतीने करण्यात आली. चिमुकलीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी अंतर्गत अवयवांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच मृत्यूचे अचूक कारण समोर येणार आहे. शवविच्छेदनावेळी प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील न्यायवैद्यक तज्ज्ञ उपस्थित होते. 

या प्रकरणातील आरोपीची शारीरिक सक्षमता तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली आहे. जलद गतीने तपासासाठी पोलिसांनी संबंधित अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच तो अहवाल उपलब्ध होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, आरोपी भीमराव कांबळे याच्या कृत्याचा त्याच्या कुटुंबीयांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्याची पत्नी आणि मुलाने केली आहे. आरोपीच्या पत्नीने म्हटले आहे की, "२०१५ पासून तो आमच्यापासून वेगळा राहतो. आम्ही स्वतः कष्ट करून उदरनिर्वाह करतो. त्याने केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. आमचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. त्याला कठोर शिक्षा व्हावी. त्याचे शवदेखील आम्हाला देऊ नये." 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ''मी काल स्वत: पीडितेच्या वडिलांशी दोनवेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं, आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करुन घ्यायची आहे. त्यासाठी वेळेत चार्जशीट दाखल होणे आणि केस चालणे, माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेत आहोत. लोकशाहीत आपल्या सगळ्यांना वाटतं, अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण ते लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते. पण कोणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये, यादृष्टीने कोणताही कोणतीही पळवाट न ठेवता या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. न्यायालयातून हे प्रकरण वेगाने मार्गी लावले जाईल.'' 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories