नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचार व खून प्रकरणाची सुनावणी २१ मे पासून विशेष न्यायालयात सुरु होणार
नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचार व खून प्रकरणाची सुनावणी २१ मे पासून विशेष न्यायालयात सुरु होणार
पुणे, ता. १९ - नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचार व खून प्रकरणाची सुनावणी २१ मे पासून विशेष न्यायालयात सुरु होणार आहे, रोजच्या रोज सुनावणी घेऊन खटला जलदगतीने चालविण्यात येणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी दिली
नसरापूर प्रकरणात राज्य शासनाने अॅड. अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. अॅड. अजय मिसर यांनी सांगितले की, ''प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात सुमारे ११०० पानी दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. या दोषारोपपत्रामध्ये एफएसएल अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि आरोपींच्या जबाबासह विविध तांत्रिक पुराव्यांचा समावेश करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार या खटल्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. त्याला विशेष न्यायालयाचा दर्जाही देण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश ६ आणि विशेष सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार असून आरोपींना कडेकोट पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले जाणार आहे.''
''या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सुनावणी 'डे-टू-डे' म्हणजेच रोजच्या रोज पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसेच सुनावणी शक्यतो 'इन-कॅमेरा' पद्धतीने होणार असून मुलीच्या कुटुंबाची गोपनीयता आणि संवेदनशील बाबींचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाकडून आवश्यक ती काळजी घेतली जाणार आहे. पोलिसांनी अवघ्या १४ दिवसांत तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र दाखल केले आहे. आता न्यायालयीन सुनावणीही वेगाने पूर्ण करुन आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी शासन आणि तपास यंत्रणा प्रयत्नशील आहे. मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याबरोबरच समाजात कठोर संदेश देण्याचाही उद्देश आहे.'' असे अॅड. अजय मिसर यांनी सांगितले.