news
clock

पंजाबमधून महाराष्ट्रात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अटक 

नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाची कामगिरी

पुणे, ता. १७ -  नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने पंजाबमधून महाराष्ट्रात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना शनिवारी (ता. १४) अटक केली आहे. अमली पदार्थाची पाकिस्तानातून पंजाबमार्गे महाराष्ट्रात तस्करी केली जात असल्याची माहिती आरोपींच्या चौकशीत उघडकीस आली. या वेळी आरोपींकडून सुमारे एक कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

तळोजा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा तपास अमली पदार्थविरोधी कक्षाकडून सुरु होता. तपासादरम्यान पंजाबमधील बलजीतसिंग आणि गोपी हे आरोपी ट्रकच्या माध्यमातून मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात अमली पदार्थ आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश धुमाळ आणि त्यांच्या पथकाने संशयित ट्रकचा नाशिकपासून पाठलाग सुरू केला. अखेर पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील निगोजे गावाजवळ ट्रक अडवून बलजीतसिंग सविंदरसिंग ऊर्फ मोनू, गुरुप्रतापसिंग शरणजीतसिंग ऊर्फ गोपी आणि करमजीतसिंग निंदरसिंग (ट्रकचालक) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

तपासात आरोपींकडून ८२.६ ग्रॅम उच्च प्रतीचे हेरॉईन (किंमत सुमारे ४१.३० लाख रुपये), ऑस्ट्रिया बनावटीचे 'ग्लॉक' पिस्तूल, दोन मॅगझिन, चार जिवंत काडतुसे, ५० लाख रुपये किमतीचा ट्रेलर, चार मोबाईल फोन आणि एक वजनकाटा असा एकूण एक कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories