पिंपरी | ७ ऑक्टोबर २०२६ : नेहरूनगर न्यायालय परिसरातील अपुरी पार्किंग व्यवस्था आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या आतील मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात वाहनतळाची व्यवस्था करण्यासह नोटरी व्यवसाय करणाऱ्या वकिलांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याच्या पर्यायाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनने महापौर रवी लांडगे, क प्रभाग अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे आणि क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे हा प्रश्न मांडला होता. त्यानंतर निखिल बोऱ्हाडे आणि अजिंक्य येळे-पाटील यांनी अण्णासाहेब मगर स्टेडियम आणि नेहरूनगर न्यायालय परिसराची पाहणी केली. यावेळी स्टेडियमच्या आतील मोकळ्या जागेत पार्किंग तसेच नोटरी वकिलांसाठी प्रशस्त प्रवेशद्वारासह स्वतंत्र व सुसज्ज जागा निर्माण करण्याबाबत चर्चा झाली.
बार असोसिएशनच्या माहितीनुसार, नेहरूनगर न्यायालयात सुमारे २ हजार नोंदणीकृत वकील असून दररोज सुमारे ३,५०० हून अधिक प्रकरणांचे कामकाज चालते. याशिवाय सुमारे दोन हजार पक्षकार, नागरिक आणि पोलीस कर्मचारी विविध कामांसाठी न्यायालयात येतात. त्या तुलनेत न्यायालयाच्या बेसमेंटमधील पार्किंगची जागा अपुरी असून पाणी साचण्याच्या समस्येमुळेही पार्किंगवर मर्यादा येत असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.
परिणामी वकील, पक्षकार आणि नागरिकांना रस्त्यावर वाहने उभी करावी लागत असल्याने न्यायालय परिसरासह विठ्ठलनगर आणि लगतच्या भागात वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा काम करणाऱ्या नोटरी वकिलांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध झाल्यास पादचारी आणि वाहनचालकांची गैरसोयही कमी होऊ शकते, अशी भूमिका मांडण्यात आली.
पाहणीवेळी बार असोसिएशनचे सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रिना मगदूम, माजी सचिव ॲड. धनंजय कोकणे, ॲड. संकेत सरोदे, ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड. विकास शर्मा यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
“वकील, पक्षकार आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी पार्किंग आणि नोटरीसाठी नियोजनबद्ध व्यवस्था होणे गरजेचे आहे. प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्याची लवकर अंमलबजावणी व्हावी,” अशी अपेक्षा ॲड. उमेश खंदारे यांनी व्यक्त केली.