पोपटांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई
वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे नुकसान भरपाई देण्याचे शासनाला आदेश
पुणे, ता. २७ - वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या शेतात पोपटांनी फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यामुळे शेतकऱ्याला वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत शेतकऱ्याने याचिका दाखल केली होती. ही याचिका मंजूर करत न्यायालयाने या शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली आहे.
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी महादेव डेकाटे यांनी ही याचिका दाखल केली होती. डेकाटे यांनी सुमारे १.५ एकर शेतीत सुमारे ८०० डाळिंबाची झाडे लावली होती. पोपटांच्या थव्यांनी २०१६ मध्ये फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. त्यामुळे शेतकऱ्याला सुमारे २० ते २५ लाखांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने याचिकेत म्हटले होते. या याचिकेवर सुनावणी पार पडली.
राज्य सरकारने संबंधित शासन निर्णयात पोपटांसारख्या पक्ष्यांमुळे झालेल्या नुकसानीबाबत भरपाईची तरतूद नसल्याचे सांगून नुकसानभरपाई देण्यास नकार दिला होता. काही विशिष्ट वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीसाठीच भरपाई देता येते, असा युक्तिवाद शासनाने केला.
न्यायालयाने, केवळ काही विशिष्ट प्रजातींमुळे झालेल्या नुकसानीवरच भरपाई देणे तर्कसंगत नाही, असे सांगितले.
वन्यजीव संरक्षण कायद्यातील 'वन्य प्राणी' या संज्ञेत पोपटांसारख्या पक्ष्यांचाही समावेश होतो. परंतु, संबंधित शासन निर्णयात (जीआर) पोपट पक्षाचा उल्लेख नाही, या कारणावरून एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले.
न्यायालयाने शेतकऱ्याची याचिका मंजूर करत २०१० रोजीच्या जीआरनुसार २०० डाळिंब बागेच्या नुकसानीसाठी प्रती झाड २०० रुपये प्रमाणे एकूण ४० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.
शेतकऱ्यातर्फे अॅड. अभय सांबरे यांनी, राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील, वरिष्ठ विधिज्ञ देवेन चौहान यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. अनुप बदर यांनी सहकार्य केले.