पिंपळे गुरवच्या शाळेला UNICEF प्रतिनिधींची भेट; विद्यार्थ्यांचे कौतुक

पिंपळे गुरवच्या शाळेला UNICEF प्रतिनिधींची भेट; विद्यार्थ्यांचे कौतुक

पिंपळे गुरव | २६ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येणारे नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि आधुनिक शिक्षण सुविधा जाणून घेण्यासाठी ॲडियन (Adyen) फिनटेक कंपनी आणि युनिसेफ (UNICEF) यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळाने पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेला भेट दिली. नेदरलँड्स, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रतिनिधींचा या मंडळात समावेश होता. शैक्षणिक सुविधांच्या पाहणीसह विद्यार्थ्यांशी झालेला मुक्त संवाद आणि सांस्कृतिक सादरीकरण हे या भेटीचे विशेष आकर्षण ठरले.

प्रतिनिधी मंडळाने शाळेतील वर्गखोल्या, डिजिटल शिक्षण व्यवस्था, ग्रंथालय, खगोलशास्त्र प्रयोगशाळा आणि STEM प्रयोगशाळांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांचे प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची माहिती त्यांनी घेतली.

महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या शाळांमध्ये विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न, पायाभूत सुविधा आणि महापालिका शाळांची शैक्षणिक वाटचाल याविषयी शिक्षण समिती सभापती रवीना आंगोळकर यांनी प्रतिनिधींना माहिती दिली.

शिक्षण अधिकारी संगीता बंगार यांनी शाळांचे प्रशासकीय व्यवस्थापन, शैक्षणिक नियोजन आणि विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, डिजिटल शिक्षण, वाचनसंस्कृतीचा विकास आणि अवकाश विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध भारतीय राज्यांच्या संस्कृती, कला आणि परंपरांचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संदेश देणारे नाटकही विद्यार्थ्यांनी संपूर्ण इंग्रजी भाषेत सादर केले. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आणि सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.

आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले. नेदरलँड्समधील शिक्षणपद्धती, अध्यापनाचे स्वरूप, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा तसेच भारत आणि नेदरलँड्सच्या शिक्षणव्यवस्थेतील फरक याविषयी विद्यार्थ्यांनी उत्सुकता दाखविली. प्रतिनिधींनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत परदेशातील शैक्षणिक व्यवस्थेची ओळख करून दिली.

प्रतिनिधी मंडळाने शिक्षकांशी संवाद साधताना आधुनिक अध्यापन पद्धती, अभ्यासक्रमाची रचना, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि शाळाबाह्य होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण व त्यामागील कारणे यावर चर्चा केली. शिक्षकांनी अध्यापनातील नावीन्यपूर्ण प्रयोग, प्रत्यक्ष अनुभव आणि विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने प्रतिनिधींसमोर मांडली. या चर्चेतून विविध देशांतील शैक्षणिक अनुभव आणि अध्यापन पद्धतींची देवाणघेवाण झाली.

या भेटीच्या माध्यमातून महापालिका शाळांमधील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, प्रयोगशील अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर मांडण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षकांना जागतिक शैक्षणिक दृष्टिकोन समजून घेण्याची संधी मिळाली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories