पिंपरीमध्ये १४ व १५ मार्चला ग्रंथोत्सव, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन
पिंपरी, ता. १० - शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने १४ व १५ मार्च २०२६ रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी येथील 'आर्य समाज पुस्तकालय व मोफत वाचनालय' येथे हा ग्रंथोत्सव होणार आहे. सर्व नागरिकांनी या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा व ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
शनिवारी पहिल्या सत्रात सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. पिपंरी परिसरातील शालेय विद्यार्थी व जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी यांचा सहभागी होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. लेखक व साहित्यिक प्रा. डॉ. शरद गायकवाड कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. दुसऱ्या सत्रात दुपारी ३ ते ४ या वेळेत 'लोकमाता ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' या विषयांवर डॉ. अनुजा कुलकर्णी यांचे व्याख्यान तसेच दुपारी ४ ते ५.३० या वेळेत ‘गझल: वाटचाल उर्दूतून मराठीकडे’ सादरकर्ते प्रदीप निफाडकर यांचे माहितीपर व्याख्यान होणार आहे.
रविवारी पहिल्या सत्रात सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत कलाविष्कारः शालेय विद्यार्थी कला गुण सादरीकरण हा विद्यार्थ्यांच्या गुणविशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात शाळा व सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहे. दुपारी २ वाजता ''चला समृध्द पिढी घडवूया'' या कार्यक्रमात वाचन संस्कारांच्या माध्यमातून सीमा शिंदे, जि.प. शिक्षिका यांचे विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ४ वाजता 'इनुची गोष्ट' या पुस्तकाचे लेखक युनूस सय्यद यांची प्रकट मुलाखत लेखिका आशा नेगी घेणार आहेत.
दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकाच्या दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ६ वाजेपर्यंत असून प्रवेश विनामूल्य आहे. तरी सर्व नागरिक व ग्रंथप्रेमी रसिकांनी या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा व ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
त्यानंतर, ग्रंथोत्सवाचा समारोप १५ मार्च रोजी जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रेया गोखले यांनी दिली दिली आहे.