प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा जाहीर, नामांकीत कंपन्यांमध्ये काम करण्याची तरुणाईला संधी
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा जाहीर, नामांकीत कंपन्यांमध्ये काम करण्याची तरुणाईला संधी
पुणे, ता. २३ - केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून देशभरात ३१ हजार ४८० पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे, जिल्हा माहिती कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
या योजनेंतर्गत उमेदवारांची पात्रता वय १८ ते २५ वर्षे, भारतीय नागरिकत्व आवश्यक, किमान १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्णवेळ नोकरी किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार अपात्र असतील. जे उमेदवार ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेत आहे ते उमेदवार पात्र आहेत. इंटर्नशिपचा कालावधी ६ ते ९ महिने असून दरमहा रु. ९,०००/- विद्यावेतन दिले जाणार आहे. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेमध्ये पुणे जिल्हयामधील महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लि. (२४०), बजाज ऑटो लि. (३०९), व्होक्सवॅगन इंडिया प्रा.लि (३), रिलायन्स इंडिस्ट्रीज लि. (३३), टेक महिंद्रा (२), बर्जर पेन्टस् इंडिया लि. (८), बीव्हीजी इंडिया लि. (२), एमक्युअर फार्मास्युटिकल्स लि. (२५), इमामी लि. (१५), फिनोलेक्स केबल्य लि. (५०) ई. नामांकित कंपनीमध्ये रिक्तपदांसाठी उमेदवारांना इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध आहे. तरी या कंपनीमध्ये अर्ज करण्यासाठी मर्यादित कालावधी असल्यामुळे pminternship.mca.gov.in या पोर्टलवर जाऊन नादणी करुन रिक्तपदाना अर्ज करावा व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ पुणे या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र. ०२०-२६१३३६०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.