माजी आमदार प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित
माजी आमदार प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित
पिंपरी, ता. ३० - माजी आमदार प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी गुरुवारी (ता. ३) मुंबईत संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी, ''आमचा झेंडा बदलला असला तरी अजेंडा तोच आहे. फक्त आमदारकीसाठी नव्हे तर सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज शिवसेनेत प्रवेश करत आहोत. हा प्रवेश केवळ आमदारकीसाठी नाही. तर, शिवसेनेच्या माध्यमातून शेतकरी, दिव्यांग बंधूभगिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत राहणार आहे.'', अशी प्रतिक्रीया बच्चू कडू यांनी व्यक्त केली. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचा शिवसेना प्रवेश ही महत्त्वाची घडामोड आहे.
बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला आहे. शिवसेनेत काम करताना प्रहार ही संघटना सक्रिय राहणार असल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांचे पक्षात स्वागत केले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''सर्वसामान्यांसाठी झटणारा, दिव्यांगासाठी लढणारा आंदोलक नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. जेव्हा जेव्हा आंदोलन मोर्चे निघाले तेव्हा त्यांची ताकद पाहिली. शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, कर्जमाफीचा निर्णय घेऊन त्या आंदोलनाला यश आले. बच्चू कडू मूळचे शिवसैनिकच आहेत. २५ वर्ष प्रहार संघटनेचे काम केले आणि त्यानंतर आज पुन्हा स्वगृही बच्चू कडू आलेत. मुद्दे, ध्येयधोरणे, गोरगरिबांना न्याय देणारे प्रश्न सोडवण्यासाठी कुठेतरी सत्तेचे बळ लागते. बच्चू कडू आणि शिवसेना समीकरण नवीन नाही. लढवय्या कार्यकर्ता आज आपल्यात आलेत. आपली लढाई विचारांची आहे. सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माझीही आणि त्यांचीही आहे. आज त्यांचे शिवसेनेत स्वागत करतो. ''
''संपूर्ण महाराष्ट्रात जिथे शिवसेना वाढवण्याचं काम करता येईल तिथे बच्चू कडू करतील. प्रहार संघटनेलाही सामाजिक कार्यात बळ मिळेल. प्रहार सामाजिक संघटना म्हणून काम करेल. मी मुख्यमंत्री असताना दिव्यांग मंत्रालय सुरू केले. त्याचा फायदा त्यांना होतोय. गोरगरिबांचे प्रश्न तुम्ही हाती घ्या, एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी उभा आहे. महाराष्ट्रातील गावाखेड्यात सगळीकडे शिवसेना मजबूत करण्याचं काम आपण करु. गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक अभियान जोमाने करु.'', असे शिंदे म्हणाले आणि ''तुम्ही ज्या विश्वासाने आलात, त्याला तडा जाणार नाही याची ग्वाही देतो. '', असे शिंदे यांनी आवर्जून बच्चू कडूंना सांगितले. त्यामुळे बच्चू कडूंना विधानपरिषदेची अधिकृत उमेदवारी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.