चिंचवड : चिंचवड परिसरात जुना वाद मिटवण्यासाठी एकत्र आलेल्या दोन गटांमध्ये पुन्हा हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर आरडाओरडा करत एकमेकांना मारहाण करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणात पोलीस शिपाई राहुल रामदास जगताप (चिंचवड पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी अरविंद वाघमोडे (वय 23, बिजलीनगर), वंश चेटटे (वय 24, चिंचवड), प्रेम वाघमोडे (वय 20, बिजलीनगर), आकाश नाळे (वय 33, चिंचवड), विजय डोंगरे (वय 24, चिंचवड) आणि रोहित म्हस्के (वय 21, चिंचवड) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांमधील जुना वाद मिटवण्यासाठी काही जण एकत्र आले होते. चर्चा सुरू असताना वाद पुन्हा वाढला. त्यानंतर संबंधितांनी रस्त्यावर एकमेकांच्या गचांडी पकडून हाताने मारहाण केली.
घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जुन्या वादातून सार्वजनिक ठिकाणी हिंसाचार करणे गंभीर स्वरूप धारण करू शकते. या घटनेत आणखी व्यक्तींचा सहभाग आहे का आणि आधीचा वाद नेमका कशावरून होता, याचा तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.