पालखी सोहळ्यांच्या मुक्कामासाठी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर आणि नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिर परिसरात तयारी पूर्ण
पालखी सोहळ्यांच्या मुक्कामासाठी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर आणि नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिर परिसरात तयारी पूर्ण
पिंपरी, ता. ८ जुलै २०२६ - आषाढीवारी पालखी सोहळाच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज पालखी व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील निवडुंगा विठोबा मंदिर, पालखी विठोबा मंदिर तसेच दिंडी विसावा परिसराची प्रशासनाने मंगळवारी (ता. ७) प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या पाहणी दरम्यान भाविकांना सुरक्षित, स्वच्छ व सुकर सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी करण्यात आलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला तसेच संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस उपआयुक्त रावले, उपायुक्त माधव जगताप, सहायक आयुक्त तिमय्या जगले, अग्निशमन प्रमुख जगताप, नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेविका पल्लवी जावळे, नगरसेविका स्नेहा माळवदे, नगरसेवक राजेंद्र काकडे, दोन्ही मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व सदस्य तसेच पोलीस व पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे गुरुवारी (ता. ९) पुण्यात आगमन होत आहे. या पालखी सोहळ्यांच्या मुक्कामासाठी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर आणि नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिर परिसरात तयारी झाली आहे. मंडप उभारणी, सजावट, विद्युत रोषणाईसह वारकऱ्यांच्या निवास, भोजन आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात होणार आहे.
निवडुंग्या विठ्ठल मंदिराचे पालखी सोहळा व्यवस्थापक रवींद्र पाध्ये म्हणाले, “पावसामुळे अनेक वारकरी आळंदी व देहूला न जाता पुण्यातच मुक्कामी येत आहेत. त्यामुळे आम्ही मंगळवारपासूनच त्यांच्यासाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. दरवर्षीप्रमाणे पालखी मुक्कामासाठी तयारी पूर्ण झाली असून पावसाचा वारकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे." शुक्रवारी (ता. १०) दोन्ही पालख्यांचा पुण्यात मुक्काम असेल. शनिवारी ( ११) दोन्ही पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ होतील.