जिल्ह्यातील धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक, उन्हाळी पिकांसाठी आवर्तन सुरु
जिल्ह्यातील धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक, उन्हाळी पिकांसाठी आवर्तन सुरु
पुणे, ता. ९ - पुणे जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये ४७.१३ टीएमसी (अब्ज घनफूट) म्हणजेच २३.७६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी या दरम्यान ३२.९२ (१६.६० टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेमध्ये ७.१६ टक्के अधिक जलसाठा आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद केली आहे.
सध्या उन्हाळी पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध राहावे म्हणून चालू महिन्यापासून धरणांतून आवर्तन सुरु करण्यात आले आहे. याचा लाभ आंबेगाव, शिरूर, खेड, इंदापूर, बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना होत आहे. सध्या खडकवासला, चासकमान, वीर, पिंपळगाव जोगे, डिंभे, घोड आणि उजनी या सात धरणांतून कालव्यांसह बंद जलवाहिनीद्वारे पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासा आहे. पुढील काही दिवस शेतकऱ्यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यास संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी राहू शकते, असे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.
जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये एकूण उपयुक्त साठवण क्षमता १९८.३४ टीएमसी असून, गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर २०२.६७ टीएमसी (१०२ टक्के) इतका साठा होता. मागील सहा महिन्यांत झालेल्या वापरामुळे सध्या धरणांमध्ये सुमारे २३ टक्के पाणी उपलब्ध आहे. सध्या धरणांत पाणीसाठा समाधानकारक असला तरी पुढील काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी पाण्याची मागणी वाढेल व धरणांतील साठा झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे, असे जलसंपदा विभागाने सांगितले आहे.
धरणानिहाय पाणीसाठा - टक्क्यांमध्ये
टेमघर - ०.९२ टक्के
वरसगाव - ३२.०४ टक्के
पानशेत - ४५.०३ टक्के
खडकवासला - ३९.८५ टक्के
पवना - ३७.३४ टक्के
कासारसाई - ३५.०६ टक्के
कळमोडी - ७६.६८ टक्के
चासकमान - २३.१७ टक्के
भामा आसखेड - ४८.०८ टक्के
आंद्रा - ४३.०५ टक्के
वडिवळे - ५६.१७ टक्के
शेटफळ - ४१.३९ टक्के
नाझरे - २०.५९ टक्के
गुंजवणी - २६.५९ टक्के
भाटघर - २७.६१ टक्के
नीरा देवघर -३९.८२ टक्के
वीर - ५१.७० टक्के
पिंपळगाव जोगे - २२.४५ टक्के
माणिकडोह - ७.३१ टक्के
येडगाव - ४७.६७ टक्के
वडज - ४४.५० टक्के
डिंभे - २३.०५ टक्के
चिल्हेवाडी - ७२.७१ टक्के
घोड - १३.६२ टक्के
विसापूर - १८.३५ टक्के
उजनी - ३.२९ टक्के