पुणे विभागातील उपनगरीय लोकल सेवेचा ४८ वा वर्धापनदिन साजरा
पिंपरी, ता. १२ - भारतीय रेल्वेच्या, पुणे विभागातील उपनगरीय लोकल सेवेचा ४८ वा वर्धापन दिन बुधवारी (ता. ११) उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता दीपक भाटी, आगारप्रमुख बी. दामोदर, रजत सोनावले, विशाल माने, सागर भिल व बाळासाहेब टोणे उपस्थित होते.
पुणे ते लोणावळाच्या दरम्यान ११ मार्च १९७८ रोजी पहिली विजेवर चालणारी उपनगरीय लोकल ट्रेन (ईएमयू) सेवा सुरु झाली होती. या सेवेमुळे हजारो प्रवाशांना जलद व विश्वासार्ह प्रवासाची सुविधा मिळाली असून, गेल्या चार दशकांत उपनगरीय रेल्वे जाळ्याचा मोठा विस्तार झाला आहे. वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर सन २००९ मध्ये १२ डब्यांच्या ईएमयू गाड्या सुरु करण्यात आल्या. सन २०१७ पासून आधुनिक सीमेन्स रॅक सेवेत दाखल झाले. सन २०२३ मध्ये शिवाजीनगर येथे ईएमयू टर्मिनस सुरु करण्यात आले.
पुणे-लोणावळा मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित व जलद होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पर्यटन आणि स्थानिक वाहतुकीसाठी हा मार्ग अधिक सोयीचा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकल्प लवकर सुरु करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड रेल्वे संघाचे माजी अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी केली.