विरुद्ध दिशेने वेगात धावणारी 'पीएमपी'ची बस, एकच गोंधळ अन् थरकाप...... पुण्यात खासगी बस चालकाचा कारनामा
विरुद्ध दिशेने वेगात धावणारी 'पीएमपी'ची बस, एकच गोंधळ अन् थरकाप
पुण्यात खासगी बस चालकाचा कारनामा
पिंपरी, ता. २७ - पुण्यात एका २० वर्षीय युवकाने अचानक 'पीएमपी'ची बस चालवून इतरांच्या जीवाला धोका निर्माण केला. हा भयावह प्रकार शनिवारी (ता. २५) शिवाजीनगर येथील डेंगळे पुलाजवळ सायंकाळी सुमारे ५.३० वाजता घडला आहे. बस चालक बस सुरु ठेऊन काही मिनीटांसाठी गाडीतून उतरला होता तेवढ्यात या युवकाने बसमध्ये चढून बस डेंगळे पुलापासून जंगली महाराज रस्त्याने थेट गोखले चौकापर्यंत (गुडलक चौक) नेली. यावेळी, विरुद्ध दिशेने भरधाव वेगात धावणारी बस पाहून रस्त्यावरील नागरीकांचा थरकाप उडाला होता. तरुणांनी आणि पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करुन गोखले चौकाजवळ बस थांबवली व त्या युवकाला बसमधून खाली खेचले व ताब्यात घेतले.
या युवकाचे नाव गोपाल बालरामसिंग राणा आहे, तो मूळचा उत्तराखंडातील पौरी गढवाल येथील रहिवासी आहे. सध्या तो पुण्यात राहतो व खासगी बस चालक म्हणून काम करत आहे. अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत तो पोलिसांच्या प्रश्नांना सुसंगत उत्तरे देत नव्हता. मानसिक संतुलन ठीक नसल्याचे जाणवल्याने शिवाजीनगर पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयातील मानसोपचार विभागात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतरच त्याची मानसिक स्थिती निश्चित होईल.
ही बस सुरक्षितपणे डेपोमध्ये परत आणण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध मोटार वाहन कायदा आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.