news
clock
अवकाळी पावसामुळे राज्यभरात पिकांचे आणि फळबागांचे नुकसान

अवकाळी पावसामुळे राज्यभरात पिकांचे आणि फळबागांचे नुकसान

अवकाळी पावसामुळे राज्यभरात पिकांचे आणि फळबागांचे नुकसान 

पुणे, ता. १९  - गेल्या आठवड्यात हवामान विभागाने पावसाचा अंदाज सांगितला होता. राज्यभरात मंगळवारी (ता. १७) रात्री पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली.  सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने काढणीच्या टप्प्यावर आलेली पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 

गेल्या आठवड्यात हवामान विभागाने पावसाचा अंदाज सांगितला होता. गेल्या दोन दिवसांत  वातावरणात काहीसा बदल झाला. त्यामुळे अचानक झालेल्या बदलामुळे सांगली व मिरज परिसरात सुमारे तासभर मोठ्या प्रमाणात गारांचा मारा झाला. द्राक्ष, आंबा, केळी या फळपिकांसह गहू, हरभरा यांसारख्या पिकांना मोठा फटका बसला. हरिपूर, अंकली, धामणी परिसरात वादळी वाऱ्यामुळे पिके पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात काढणीला आलेले शाळू व गहू पीक जमीनदोस्त झाले. कापून ठेवलेला गहू भिजला. 

लातूर व धाराशिव जिल्ह्यांत देवणी, उदगीर, निलंगा, लोहारा, उमरगा, तुळजापूर भागांत गारपीट झाली. गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला व फळबागांना फटका बसला. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. मोठ्या गारांमुळे अनेक पिके जमीनदोस्त झाली. हिंगोली जिल्ह्यात वसमत व कळमनुरी तालुक्यांत वादळी पावसाचा जोर अधिक होता. केळी, हळद, आंबा तसेच रब्बी पिकांचे नुकसान झाले. आंब्याच्या फांद्या मोडून फळगळ झाली, तर काढणी केलेली पिके भिजल्याने हानी वाढली.

पूर्वमोसमी पावसाच्या या तडाख्यामुळे काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories