टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ओटीपी आधारित सॉफ्टवेअर प्रणाली तातडीने लागू करावी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ओटीपी आधारित सॉफ्टवेअर प्रणाली तातडीने लागू करावी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
पुणे, ता. १३ - जिल्ह्यात टँकरद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नियंत्रित करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी ओटीपी (OTP) आधारित सॉफ्टवेअर प्रणालीचा अवलंब करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी शाखेकडून पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए आणि पुणे जिल्हा परिषदेला पाठविण्यात आले आहे.
या OTP आधारित सॉफ्टवेअर प्रणालीमुळे टँकरचे GPS ट्रॅकिंग करता येणार असून टँकर कुठून निघाला, कुठे पोहोचला, किती वेळात पोहोचला याचे रिअल-टाईम मॉनिटरिंग शक्य होणार आहे. तसेच टँकर चालकांची शारीरिक तपासणी, अल्कोहोल टेस्ट आदी बाबींची नोंद ठेवता येणार असल्याने संपूर्ण यंत्रणा अधिक जबाबदार आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता झालेल्या बैठकीत या नव्या प्रणालीबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले होते. बैठकीस विविध संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठा व्यवस्थापनात पारदर्शकता आणणे आणि नागरिकांना वेळेत व सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करणे हा या प्रणालीमागील मुख्य उद्देश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशासनाच्या मते, या प्रणालीमुळे पाणीटंचाईच्या काळात टँकर व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टँकर्समध्ये ही प्रणाली तातडीने लागू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी ही प्रणाली तातडीने लागू करावी....
“पुणे जिल्ह्यात टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे ही काळाची गरज आहे. ओटीपी आधारित सॉफ्टवेअर प्रणालीमुळे प्रत्येक टँकरचा प्रवास, वितरण आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठा यावर रिअल-टाईम नियंत्रण ठेवता येईल. यामुळे केवळ गैरप्रकारांना आळा बसणार नाही तर नागरिकांपर्यंत वेळेत आणि निश्चित प्रमाणात पाणी पोहोचेल याची खात्रीही मिळेल. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी ही प्रणाली तातडीने आणि प्रभावीपणे राबवावी.
– जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी