रहाटणीतील अपहृत व्यापाऱ्याची सुरक्षित सुटका केल्याबद्दल पोलिस आयुक्तांचा व्यापाऱ्यांकडून सन्मान
पिंंपरी, ता. ११ - रहाटणी परिसरात व्यापाऱ्याचे अपहरण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या सहा तासांत धाडसी कारवाई करत व्यापाऱ्याची सुरक्षित सुटका केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे (CP), पोलीस उपायुक्त शिवाजी पवार (DCP) आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचा व्यापारी वर्गाच्या वतीने सत्कार करुन आभार व्यक्त करण्यात आले.
रहाटणी परिसरात पाच जणांनी स्वतःला ‘उत्तर प्रदेश पोलीस’ असल्याचे भासवून एका व्यापाऱ्याचे अपहरण केले आणि त्याच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरु केला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा तब्बल १०० किलोमीटरपर्यंत पाठलाग केला.
संगमनेर येथील टोल नाका परिसरात पोलिसांनी आरोपींना वेढा घालत व्यापाऱ्याची अवघ्या सहा तासांत व्यापाऱ्याची सुखरुप सुटका केली. या प्रकरणात खंडणीविरोधी पथकाने पाचही आरोपींना अटक केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.
या यशस्वी कारवाईत पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परता व कर्तव्यदक्षतेबद्दल संबंधित व्यापाऱ्याच्या कुटुंबीयांसह शहरातील व्यापारी वर्गाने पोलिसांचे आभार मानले. यावेळी झालेल्या सत्कार समारंभात नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू शेठ आसवाणी, सुरेश जेसवाणी, विजय रामनानी, डॉ. कृष्णन वीरवाणी, सुनील केसवाणी, राज कुमार, घनश्याम ललवाणी, महेंद्र पाणीवाणी, झामन दास, श्रीचंद मंधान, सनी गोविया आदी व्यापारी उपस्थित होते.