बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी १ मार्चपासून राज्यव्यापी मोहिम
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मोटार वाहतूक विभागाला निर्देश
पिंपरी, ता. २७ - राज्यभरात सर्वत्र नियमांचे उल्लंघन करुन प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी १ मार्चपासून राज्यव्यापी मोहिम हाती घेण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहतूक विभागाला (आरटीओ) दिले आहेत.
प्रवाशांची बेकायदेशीर वाहतूकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरनाईक विधानभवनात बैठक बोलावली. या बैठकीला वाहतूक आयुक्त राजेश नार्वेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रताप सरनाईक म्हणाले, ''ओव्हरलोडिंग वाहने, नियमित वाहन तपासणीचा अभाव आणि सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे. जर अशा वाहनांमध्ये वैध विमा नसेल, तर अपघातानंतर प्रवाशांना भरपाई मिळणे कठीण होते. अनेकदा वाहन मालक किंवा चालक जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात. अपघातग्रस्तांना न्याय मिळण्यास विलंब होतो. ग्रामीण भागात बेकायदेशीर वाहतुकीमुळे सरकारी बससेवेचेही मोठे नुकसान होत आहे. राज परिवहन महामंडळाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवासी संख्येत घट झाल्याने नियोजित मार्ग आणि वेळापत्रकांवरही परिणाम होतो आहे. मानवी तस्करी, दरोडा आणि इतर गुन्हेही बेकायदेशीर वाहतूकीद्वारे घडतात. ''
''बेकायदशीर वाहतूकीचा प्रश्न सोडवण्यासाठी मोटार वाहतूक विभागाने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. नियमित तपासणी मोहिमा राबवल्या पाहिजेत आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. ऑनलाइन आणि पारदर्शक परवाना प्रक्रियेद्वारे कायदेशीर वाहतूक सुलभ करण्याची गरज आहे आणि प्रवाशांनी सार्वजनिक वाहतूकीचा वापर करणे गरजेचे आहे.'', असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.