देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी सहकार्य करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी - कामगार नेते यशवंत भोसले
देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी सहकार्य करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी - कामगार नेते यशवंत भोसले
राष्ट्रीय श्रमिक आघाडीची पत्रकार परिषद
पिंपरी, ता. १४ - ''पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशवासियांना केलेले आवाहन हे राष्ट्रीय जबाबदारीचे प्रतिक आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे आपण सोन्या-चांदीची अनावश्यक खरेदी टाळूया, पेट्रोल-डिझेल काटकसरीने वापरुया अन् स्वदेशी उत्पादनांचा अंगीकार करुया. देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी सहकार्य करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.'', असे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, मत कामगार नेते यशवंत भोसले यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनांला प्रतिसाद देत नागरीकांमध्ये जागृती करण्यासाठी बुधवारी (ता. १३) राष्ट्रीय श्रमिक आघाडी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात कामगार नेते यशवंत भोसले यांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भूमिका स्पष्ट केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यशवंत भोसले म्हणाले, ''सध्या सुरु असलेल्या आखाती देशांमधील युद्धाची झळ आपल्या देशाला पोचली आहे. या परिस्थितीत देश आर्थिकदृष्ट्या मजबूत राहिला तरच मजूर, शेतकरी व सामान्य नागरीक सुरक्षित राहतील. त्यामुळे, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे सोन्या-चांदीची अनावश्यक खरेदी टाळून, पेट्रोल-डिझेल काटकसरीने वापरुन अन् स्वदेशी उत्पादनांचा अंगीकार करुन देशाचे आर्थिक स्थैर्य टिकवणे ही नागरीकांची सामूहिक जबाबदारी आहे.''
याबरोबरच,''केंद्र सरकारने देशाच्या आर्थिक शिस्तीसाठी ठोस पावले उचलणे नितांत गरजेचे आहे. यामध्ये सरकारने इंधनावरील कर कमी करावा, आवश्यक वस्तूंवरील नियंत्रण मजबूत करावे, कामगार व शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण द्यावे, रोजगाराच्या संधी वाढवाव्यात. आज आपला देश एका आर्थिक आव्हानात्मक टप्प्यावर उभा आहे. या काळात संय, राष्ट्रीय एकात्मता व आर्थिक शिस्त या माध्यमातून आपण देशाला अधिक सक्षम बनवू शकतो.'' असे यशवंत भोसले म्हणाले.