समृद्धी महामार्गावर पुढील महिन्यापासून 'इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' कार्यान्वित होणार
समृद्धी महामार्गावर पुढील महिन्यापासून 'इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' कार्यान्वित होणार
पुणे, ता. १९ - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर पुढील महिन्यापासून 'इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' कार्यान्वित होणार आहे. याद्वारे बेशिस्त वाहनचालकांना हेरुन त्यांच्यावर त्वरीत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. संपूर्ण समृद्धी महामार्गावर ही प्रणाली ऑगस्टपर्यंत कार्यान्वित केली जाणार असून, एकूण ७०१ किलोमीटर लांबीचा मार्ग या प्रणालीच्या कक्षेत येणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर ते जालना या सुमारे ३६४ किलोमीटर अंतरावर ही सेवा सुरू केली जाणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे १६९८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. केंद्रीकृत नियंत्रण कक्ष आणि सात विभागीय नियंत्रण केंद्रांच्या माध्यमातून संपूर्ण महामार्गावर सतत लक्ष ठेवले जाणार आहे. अतिवेगाने वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन नेणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे, सीट बेल्ट न लावणे, बोगद्यात दिवे न लावणे, फॅन्सी नंबर प्लेट वापरणे, लेन शिस्त न पाळणे, दुचाकीला महामार्गावर प्रवेश करणे, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे आणि ओव्हरलोड वाहने या नियमोल्लंघनावर ही प्रणाली २४ तास देखरेख ठेवेल.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याद्वारे अपघाताच्या वेळी जलद मदत पोहोचवणे शक्य होणार आहे. प्रत्येक दोन किलोमीटरवर आपत्कालीन मदत केंद्रेही उभारण्यात आली आहेत. प्रभावी वाहतूक नियंत्रणासाठीही ही प्रणाली महत्त्वाची ठरेल. या नव्या व्यवस्थेमुळे समृद्धी महामार्गावरील अपघात कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला आहे.