सांगवी | ३० सप्टेंबर २०२६ : एचडीएफसी बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून कार लोन फोरक्लोज करण्याच्या बहाण्याने ४४ वर्षीय महिलेची २ लाख २२ हजार ४७४ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका ४४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ऋतिक सदानंद कासारे (रा. बेलवली, बदलापूर, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने फिर्यादीला फोन करून आपण एचडीएफसी बँकेच्या बंडगार्डन येथील शाखेचा कर्मचारी असल्याचे भासवले. त्यानंतर फिर्यादीचे कार लोन फोरक्लोज करून देतो, असे सांगून तिचा विश्वास संपादन केला.
आरोपीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यांवर एकूण २ लाख २२ हजार ४७४ रुपये पाठवले. मात्र, आरोपीने कार लोन फोरक्लोज केले नाही. तसेच पैसे परत करण्यासाठी वारंवार संपर्क करूनही आजपर्यंत कोणतीही रक्कम परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.