'वनसंपदेच्या नुकसानाची व शिकारींची माहिती कळवा आणि रोख बक्षीस मिळवा', सातारा जिल्ह्यातील उपक्रम
Feb 25 2026
44
'वनसंपदेच्या नुकसानाची व शिकारींची माहिती कळवा आणि रोख बक्षीस मिळवा', सातारा जिल्ह्यातील उपक्रम
पिंपरी, ता. २५ - सातारा जिल्ह्यातील दुर्गम कास परिसरातील रोहोट परिमंडळमधील नियतक्षेत्र रोहोट, खडगाव, धावलीमधील सर्व गावांत शिकारमुक्तीचे अभियान राबवले जात आहे. या अभियानात 'वनसंपदेच्या नुकसानाची व शिकारींची माहिती कळवा आणि रोख बक्षीस मिळवा' असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रोहोट परिमंडळाचे वनपाल राजाराम काशीद यांनी पुढाकार घेत या उपक्रमाची आखणी केली आहे. रोहोट परिमंडळमध्ये शिकारीस आळा बसण्यासाठी पोलिस विभागाप्रमाणे गोपनीय खबऱ्यांचे जाळे तयार केले असून, शिकारीस आळा घालण्यासाठी रात्रीची गस्त सुरु आहे, असे काशीद यांनी सांगितले.
वनपाल राजाराम काशीद यांनी आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात शिकार होत असल्यास, तसेच जंगल क्षेत्रात आग लावून वनसंपदेचे नुकसान करणे, वन क्षेत्रात विना परवाना अतिक्रमण करणे, मानव व वन्यजीव संघर्ष अशा बाबी निदर्शनास आल्यास नजीकच्या वनरक्षक, वनपाल यांना तत्काळ कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, तसेच त्यास योग्य बक्षीस दिले जाईल. अवैध शिकार घडल्यास प्रकरणातील आरोपीस तीन ते सात वर्षे शिक्षा, २५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अवैध वृक्षतोड करताना कोणी निदर्शनास आल्यास तत्काळ संपर्क साधावा.
एक जबाबदार नागरिक म्हणून वनांचे संरक्षण करणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. जंगलापासून आवश्यक प्राण वायू, पर्जन्यमान, मृद संधारण असे महत्त्वाचे उपक्रम राबवले जात असून पुढील पिढीसाठी प्रत्येकाने एक झाड लावणे गरजेचे आहे, असे काशीद यांनी सांगितले आहे. वनपाल काशीद हे कास पठार, भांबवली धबधबा या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी निसर्गावर पुस्तके लिहिली आहेत.