पिंपरी | 18 सप्टेंबर 2026 : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान’ आणि ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ आणि संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ यांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा पाच ज्येष्ठ नागरिकांसह एक ज्येष्ठ नागरिक संघ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या एका संस्थेची सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या ४ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
वैयक्तिक कृतज्ञता सन्मानाच्या महिला विभागातून नवी मुंबई (रायगड) येथील वृषाली मगदुम आणि नांदेड येथील भागीरथी बच्चेवार यांची निवड करण्यात आली आहे. पुरुष विभागातून लातूर येथील प्रकाश घादगिने आणि ठाणे येथील बबन पाटणकर यांना सन्मान जाहीर झाला आहे. तर दिव्यांग प्रवर्गातून पुणे येथील मानव कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ आणि संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाची सन्मानार्थी संघ म्हणून निवड करण्यात आली आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत संस्था या गटातून पुणे येथील जनसेवा फाउंडेशनची निवड झाली आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित आनंद मेळाव्यात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक, खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडणार आहे.
समाजाच्या जडणघडणीत नि:स्वार्थपणे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, संघ आणि संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे सन्मान प्रदान करण्यात येत असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.