चिंचवडमध्ये झाले अनोखे कविसंमेलन......''सुंदर माझे जाते गं'', शब्दधन काव्यमंचाच्या वतीने आयोजन

चिंचवडमध्ये झाले अनोखे कविसंमेलन......''सुंदर माझे जाते गं'', शब्दधन काव्यमंचाच्या वतीने आयोजन

चिंचवडमध्ये झाले अनोखे कविसंमेलन......''सुंदर माझे जाते गं'' 

पिंपरी, ता. ८ - ''जाते हे ग्रामसंस्कृती आणि श्रमसंस्कृतीचे प्रतीक आहे. माता-भगिनी जात्यावर दळायल्या बसल्या की ओव्या सुचायच्या आणि त्यातून आपले मौखिक लोकसाहित्य समृद्ध झाले.'', अशी माहिती सांगून ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी लोकसाहित्याचा एक पदर उलगडला. 

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे रविवारी (ता. ७) शब्दधन काव्यमंच आयोजित  'सुंदर माझे जाते गं...' या अभिनव कविसंमेलनाचे उद्घाटन प्रभुणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. छाया कांकरिया कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे, प्रबोधनकार शारदा मुंडे, जात्यावरील ज्येष्ठ ओव्या गायिका इंदुबाई कणसे, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती. बाळकृष्णाची वेषभूषा साकारुन सानवी स्वप्निल चव्हाण ही शालेय विद्यार्थिनी कविसंमेलनात सहभागी झाली होती.

प्रारंभी सजवलेल्या जात्याचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले तसेच सुभाष चव्हाण यांनी मंगलमय शंखवादन केले, संत जनाबाईंच्या ओव्यांचे गायन करण्यात आले.  त्यानंतर झालेल्या कविसंमेलनात संजय गमे, शोभा जोशी, तानाजी एकोंडे, राधाबाई वाघमारे, बाळकृष्ण अमृतकर, मेहमुदा शेख, आय. के. शेख, अंबादास रोडे, फुलवती जगताप, कैलास भैरट, संगीता सलवाजी, शामराव सरकाळे, कल्पना बंब, सूर्यकांत भोसले, शामला पंडित, जयश्री श्रीखंडे, सुभाष चटणे यांनी बाळकृष्णासमवेत जात्यावर दळण दळताना स्वरचित गेय कवितांचे सादरीकरण केले. इंदुबाई कणसे यांनी पारंपरिक ओव्यांचे गायन केले. नारायण कुंभार यांनी कविसंमेलनाचा लालित्यपूर्ण शैलीतून आढावा घेतला. शारदा मुंडे यांनी प्रबोधनपर मनोगत व्यक्त केले. नंदकुमार मुरडे यांनी प्रभावी कथाकथन केले. छाया कांकरिया यांनी अध्यक्षीय मनोगतातून शब्दधन काव्यमंचाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाविषयी गौरवोद्गार काढले. 

याप्रसंगी संयुजा टाटिया यांच्या वतीने पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. मीरा कंक, अशोक महाराज गोरे, अण्णा गुरव, बाळासाहेब साळुंके, दत्ता कांगळे, अरुण घोडके, सुधीर भालेराव, शोभना भालेराव, मानसी चिटणीस यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले.










Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories