news
clock

मावळातील शिरोता वनक्षेत्र हद्दीतील प्रस्तावित जल विद्युतनिर्मिती प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध

तहसीलदार व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन, जैवविविधता नष्ट होण्याचा धोका  

पिंपरी, ता. १८ - मावळ तालुक्यात शिरोता वनक्षेत्र हद्दीतील प्रस्तावित जल विद्युतनिर्मिती प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे.  ''प्रकल्प कायमस्वरूपी रद्द न झाल्यास आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल,'' असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत, वडगाव येथे तहसीलदार आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.

 मावळ तालुक्यातील शिरोता भागात वनविभाग, धरण आणि निसर्गसंपन्न परिसर आहे. हा परिसर वडीवळे धरणाच्या जवळ आणि पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला आहे.  शिरोता परिसर वनक्षेत्रासाठी आणि पर्यावरणीय पर्यटनासाठी ओळखला जातो. येथे  जल विद्युतनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि डोंगर उत्खनन होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे दुर्मीळ वृक्ष, वेली आणि प्राण्यांच्या अस्तित्व नाहीसे होण्याची शक्यता आहे. 

याशिवाय, शिरोता परिसर समृद्ध व जैवविविधतेने नटलेला आहे. मावळातील संवेदनशील हा भाग आहे.  सांबरासह अन्य प्राण्यांचा येथे राहतात.  महाराष्ट्राचा राज्यप्राणी 'शेकरू' आणि हरणाची दुर्मीळ प्रजात 'पिसोरी' यांचाही या जंगलात वावर आहे. मात्र, या प्रकल्पामुळे येथील जंगल नष्ट होऊन वन्यप्राणी बेघर होण्याची भीती आहे, असे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.

स्थानिक नागरीकांना विश्वासात न घेता किंवा त्यांच्या हरकतींकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ''मावळचा निसर्ग हीच आमची खरी संपत्ती आहे. तुटपुंज्या रोजगारासाठी आम्ही निसर्गाचा बळी देऊ देणार नाही. जर प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन प्रकल्प तातडीने थांबवला नाही, तर उपोषण करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.'' असे अधिकाऱ्यांना निवेदन देताना नागरीकांनी ठामपणे सांगितले आहे

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories