रक्षक चौकातील उड्डाणपुलाच्या रचनेतील चुका त्वरीत सुधारा, अन्यथा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील - खासदार श्रीरंग बारणे
रक्षक चौकातील उड्डाणपुलाच्या रचनेतील चुका त्वरीत सुधारा, अन्यथा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील - खासदार श्रीरंग बारणे
पिंपरी, ता. २५ - पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम खुला झाल्यानंतर पुढच्या दोन दिवसांत पुलावर चार अपघात झाले. या पुलावर असलेला तीव्र उतार अपघातांचे मुख्य कारण ठरत असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला इशारा दिला आहे की, महापालिकेने पुलाच्या रचनेतील आपल्या चुका तातडीने सुधाराव्यात, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील.
सांगवी फाटा ते रावेत बीआरटीएस मार्गावरील पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील हा नवीन उड्डाणपूल २३ मे रोजी वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. पुढच्या दोन दिवसांत पुलावर चार अपघात झाले. पुलावरील तीव्र उतारामुळे वाहनचालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून हे अपघात होत आहेत. हा पूल वाहतूकीसाठी तत्काळ खुला करण्यात यावा, यासाठी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. आमदार जगताप यांच्या या पत्राची महापालिका प्रशासनाने सकारात्मक दखल घेतली आहे. प्रशासनाने तत्परता दाखवत सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक प्रक्रिया पूर्ण करुन हा उड्डाणपूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला.
या अपघातांमुळे खासदार बारणे यांनी संताप व्यक्त करत महापालिका प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. काही दिवसांपूर्वीच मी या पुलाची पाहणी करुन येथील तीव्र उताराबाबत संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पूल सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून अपघात सुरु झाले, असे खासदार बारणे यांनी सांगितले आहे.