वस्तीतील महिला पास झाल्या बारावीची परीक्षा
कोथरुडच्या किष्किंधानगर वसाहतीतील महिलांचे यश, अभिनव विकास फाउंडेशनचा पुढाकार
पिंपरी ता. 4, (संध्या नांगरे : पीसीएमसी न्यूज) - लोखंडाला परिसस्पर्श झाल्यावर त्याचं सोनं होतं असं म्हटलं जातं. अगदी ही म्हणीप्रमाणेच, 'अभिनव विकास फाउंडेशन' या संस्थेच्या रुपाने परीसस्पर्श होऊन वस्तीतील दोन महिलांच्या जीवनाचे सोने झाले आहे. फाउंडेशनने या महिलांचं रखडलेलं शिक्षण सुरु केलं आणि नुकत्याच त्या बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. पुढे, भरारी घेण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.
इतरांच्या घरची घरकामे करुन उदरनिर्वाह करत बारावी पास झालेल्या या भगिनी म्हणजे रत्नमाला दाभाडे (वय 34 वर्षे) आणि मोनिका दाभाडे (वय 28 वर्षे). रत्नमाला यांनी 43.50 % आणि मोनिका यांनी 54. 67% मिळवले आहेत. या दोघींचा थांबलेले शिक्षण पुन्हा सुरु करण्यापासून ते बारावी पास होण्यापर्यंतचा प्रवास हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
रत्नमाला आणि मोनिका दोघीही कोथरुडपरिसराती किष्किंधानगर वसाहतीत स्थायिक आहेत. दोघीही इतरांच्या घरी जुन्या भांड्याची कामे करतात. अभिनव विकास फाउंडेशन गेली अनेक वर्षे किष्किंधानगर वसाहतीत शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य करत आहे. रत्नमाला यांची तीनही मुले फाउंडेशनच्या वर्गात अभ्यासाला जात आहेत. त्यामुळे रत्नमालाही फाउंडेशनशी जोडल्या गेल्या. लग्नआधी त्यांचं शिक्षण नववीपर्यंतच झालं होतं. नंतर, संसाराच्या व्यापातून शिक्षणाची इच्छा अपूर्णच राहिली होती. पण, मनात शिक्षणाची ओढ कायम होती. सन 2023 मध्ये त्या दहावीची परीक्षा पास झाल्या. पुढं, अभिनव विकास फाउंडेशनच्या अभ्यास वर्गातून प्रेरणा घेऊन रत्नमाला त्यांनी बारावीची परीक्षा द्यायचं ठरवलं. आई आणि मुलं एकत्र अभ्यासवर्गात एकत्र अभ्यास करु लागली.
मोनिका दाभाडे यांचेही असेच आहे. मोनिका आठवीत असल्यापासून कामाला जायच्या. दहावीनंतर त्यांचं शिक्षण थांबलं. इतक्यात लग्नही झालं. लग्नानंतर शिक्षणाचा विषय मागे पडला. त्यांचा घटस्फोट झाला. मोनिका यांच्या पतीने त्यांना साथ दिली नाही. ''तू बारावी पास होऊ शकत नाहीस.'', असं तो म्हणायचा. याच नकारात्मक परिस्थितीमुळे मोनिका यांच्या मनात पुन्हा शिक्षणाची उर्मी निर्माण झाली आणि त्याही फाउंडेशनशी जोडल्या गेल्या.
रत्नमाला आणि मोनिका या दोघींनाही अभिनव विकास फाउंडेशनने शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन दोघींच्याही शिक्षणाची जबाबदारी घेतली. बारावीच्या परीक्षेसाठी त्यांचे अभ्यासवर्ग घेतले आणि हे वर्ग घेताना या दोघींच्या सोयीची वेळ निवडली, हे फार कौतुकास्पद आहे. फाउंडेशनचे संचालक गौरी आणि विकास हे दाम्पत्य या दोघींसाठी रात्री साडेआठ नंतर त्यांना शिकवायला वसाहतीत जायचे. रात्री बारा वाजेपर्यंत ते दोघींचा अभ्यास घ्यायचे. त्यांची परीक्षेची सर्व तयारी या दांपत्याने करुन घेतली. परीक्षेचा अर्जही भरुन दिला. आपली कामं आणि घर सांभाळून रत्नमाला आणि मोनिका यांनी गौरीताई व विकास सरांच्या मार्गदर्शनाखाली बारावीची परीक्षा दिली आणि चांगले गुण मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. अभिनव विकास फाउंडेशनच्या परिसस्पर्शाने त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली आहे. आता त्या पुढचं शिक्षण घेणार आहेत.

इतर महिलांनाही प्रोत्साहन देणार...
रत्नमाला दाभाडे म्हणाल्या, "तब्बल 19 वर्षांच्या अंतरानंतर मी बारावीची परीक्षा दिली. माझ्या मुलांच्या बरोबरीने मला पुन्हा शिकायला मिळालं हे माझं भाग्य आहे. मी बारावी पास होण्याचे सर्व श्रेय गौरीताई आणि विकास सर यांचे आहे. त्यांनी आमच्या वेळेनुसार आमचा अभ्यास घेतला. पूर्ण तयारी करुन घेतली प्रसंगी ऑनलाईन वर्गही घेतला. माझे पती नारायण व मुलांनी मला परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. मी बारावी पास झाले याचे माझ्या सर्व कुटुंबीयांना कौतुक आहे. मला शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे गौरीताई आणि विकास सर यांचे मी मनापासून आभार मानते. आता ज्यांचे शिक्षण मागे पडले आहे अशा शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भगिनींनाही मी पुढचं शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे "
आता ग्रॅज्युएशन करणार...
मोनिका म्हणाल्या, "मी बारावीची परीक्षा पास झाले हे गौरीताईंमुळे शक्य झाले आहे. त्यांनी निरपेक्षपणे आम्हाला आमच्या वेळेनुसार अगदी हसतखेळत शिकवले. पुस्तकापेक्षा त्यांनी शिकवलेले माझ्या अधिक लक्षात राहिले. त्यांच्यामुळे मी चांगल्या पद्धतीने बारावीची परीक्षा देऊ शकले. आता ताईंच्या मार्गदर्शनाखाली मी चांगल्या नोकरीसाठी प्रयत्न करणार आहे. ग्रॅज्युएशनदेखील पूर्ण करणार आहे."
आमचे पालक शिक्षणाकडे वळल्याचा आनंद मोठा....
" अभिनव विकास फाउंडेशनमध्ये अध्ययन करणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांचे पालक देखील शिक्षणाकडे वळत आहेत आणि या दोघी पालक बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या याचा आम्हाला खूप आनंद आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या लहान मोठ्या सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं आमचं काम यापुढेही असंच सातत्याने सुरु राहील."
- गौरी सोनवणे-बोरकर (संचालक, अभिनव विकास फाउंडेशन)