सहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांना मिळणार संधी........'इस्रो' अन् 'नासा'ला भेट देण्याची
पुणे, ता. ७ - राज्य शासनाने 'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेतील 'नासा' या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे, यासाठी ३.३० कोटी रुपये खर्च केला जाणार करणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारसरणी आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, त्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना मिळून भविष्यातील संशोधक घडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे.
हा उपक्रम इयत्ता सहावी ते आठवी (उच्च प्राथमिक स्तर) व इयत्ता नववी ते बारावी (माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर) या गटातील विद्यार्थ्यांसाठी आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विज्ञान केंद्रांना भेट देण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शनात प्रथम येणाऱ्या एकूण २१४८ विद्यार्थ्यांना जवळच्या विज्ञान केंद्रांना भेट देण्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर निवड झालेल्या १८० विद्यार्थ्यांना बंगळुरु येथील इस्रो केंद्राला भेट देण्याचे आयोजन करण्यात येणार आहे.