पेट्रोल पंपावरच डिझेल टॅंकरला लागलेली आग १५ मिनीटांत आटोक्यात, तळेगाव दाभाडेमधील घटना
Apr 16 2026
40
पेट्रोल पंपावरच डिझेल टॅंकरला लागलेली आग १५ मिनीटांत आटोक्यात, तळेगाव दाभाडेमधील घटना
पिंपरी, ता. १६ - तळेगाव दाभाडे येथील भारत पेट्रोल पंपावर बुधवारी (ता. १५) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास डिझेल टँकरच्या व्हॉल्वला अचानक आग लागली. या आगीत टँकर चालक किरकोळ जखमी झाला. तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्याने १५ मिनिटात ही आग आटोक्यात आणण्यात आली.
तळेगाव दाभाडे येथील भारत पेट्रोलियम पंपावर नेहमीप्रमाणे डिझेलचा टँकर आला होता. पंपावर टॅंकर उभा असताना अचानक टॅंकरच्या व्हॉल्वने पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच टँकर चालकाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवण्याच्या प्रयत्नात चालक किरकोळ भाजला आहे. त्याला त्वरित लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी पोचला. जवानांनी मोठ्या प्रयत्नांनी पंधरा मिनिटात आग आटोक्यात आणली, असे तळेगाव दाभाडे ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले.